शेंदुर्णी सोयगाव रस्त्याचे काम ठप्प ,भाविकांची गैरसोय ,प्रशासनाचे दुर्लक्ष.

437

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी –  शेंदुर्णी सोयगाव रस्त्यावरील शेंदुर्णी शहरातून जाणारा दोन किलोमीटर चा रस्ताचे काम खोळबलेले आहे. परंतु याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक व भाविकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेरच्या अख्यारीत रस्त्याचे काम तात्काळ व्हावे अशी ही मागणी यात झालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शेंदुर्णी संत नगरीत गेल्या तीन दिवसापासून अष्ट शताब्दी महोत्सव सुरू आहे. लाखो भाविक शेंदुर्णीत येत आहे .परंतु रस्त्याचे काम अपूर्ण व जागोजागी गड्डे खोदलेले रस्ते व मुरूम टाकलेले ढिगारे पाहून भाविकांमध्ये व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अक्षरशा कसरत करीत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. सदर रस्ता दुरुस्त व्हावा जागोजागी पडलेले मातीचे ढिगारे उचलावे, गड्डे बुजावे, रस्त्याचे सिम्युनिटीकरण, काँक्रिटीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. नागरिकांची वाहतूकदारांची भाविकांची गैरसोय थांबवावी अशी ही मागणी या निमित्ताने जोर करीत आहे.