शिस्तप्रिय आणि धडाकेबाज तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली , आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त.

मुंबई – दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन खातं सातत्याने चर्चेत आहे. या विभागातल्या अधिकाऱ्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसतात. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे या खात्याचे मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी या विभागातील अधिकाऱ्याने मंत्रायलातच लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाचलुचपत विभागाने मंत्रालयातच त्याला अटक करत कारवाई केली होती. अन्न आणि औषध प्रशासन खात्यावर सत्ताधारी भाजपचे आमदारही नाराज असल्याचं दिसून येतंय. अनेकदा तक्रारी करूनही या विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असा तक्रारीचा सूरही त्यांनी गेल्या वेळच्या अधिवेशनामध्ये मांडला होता. त्याचवेळी या विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभार मात्र सुरूच असल्याची दबक्या आवाजात चर्चा असते. आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता या खात्याचे नवे आयुक्त असणार आहेत. या आधी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात आयुक्त म्हणून काम करताना मोठी कारवाई केली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. तुकाराम मुंढेंची ही साफसफाईची कामं सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली. 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आणि दिव्यांग विभागातील बोगस अधिकाऱ्यांवरची कारवाईही थांबली. त्यानंतर मुंढे यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मदत कार्य विभागात बदली करण्यात आली. या बदलीला दीड महिनेही उलटून जात नाहीत तोपर्यंत आता पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.