हनीमूनवेळी तो तिला ‘सेकंड हँड’ म्हणाला, कोर्टाने पतीला 3 कोटीची भरपाई देण्याचा आदेश दिला.

27

प्रतिनिधी मुंबई – 1994 मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याचे लग्न 2017 मध्ये तुटले. हा वाद कोर्टात गेला. कोर्टामध्ये पिडीत महिलेने जे काही सांगितले ते ऐकून कोर्टालाही धक्का बसला. अखेर, त्या महिलेची बाजू ऐकून कोर्टाने पतीला 3 कोटीची भरपाई देण्याचा आदेश दिला.

तो अमेरिकेला रहात होता तर ती मुंबईमध्ये. 1994 साली त्यांचे लग्न झाले. हनिमूनसाठी ते दोघे नेपाळला गेले. मात्र, हनिमूनच्या रात्री त्याने तिला ‘सेकंड हँड’ म्हटले. तिचे पूर्वी लग्न जुळले होते. पण काही कारणामुळे ते तुटले. याच कारणामुळे त्याने तिला ‘सेकंड हँड’ म्हटले होते. हनिमून झाला आणि ते दोघे अमेरिकेला गेले. तिकडे अमेरिकेत पतीने मोठा लग्नसोहळा आयोजित केला. सुरवातीचे काही दिवस अत्यंत सुखात गेले. पण, तिच्या मनातील ‘सेकंड हँड’ हा शब्द काही जात नव्हता. त्यावरून त्यांची भांडणे होऊ लागली. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खोटे आरोप करू लागला. राग येऊन तिला मारहाणही करू लागला. 2005 मध्ये दोघेही पती पत्नी मुंबईत परतले. मुंबईतील संयुक्त मालकीच्या घरात ते राहू लागले. मात्र, त्यांच्यामध्ये भांडणे आणि त्याची मारहाण सुरूच होती. या सर्व प्रकाराला कंटाळून ती 2008 साली आईसोबत राहण्यासाठी तिच्या माहेरी निघून गेली. अधूनमधून ती पतीच्या घरी जात असे. पण, पुन्हा तोच प्रकार घडत असे. 2014 साली तिचा नवरा तिला सोडून पुन्हा अमेरिकेला निघून गेला.

2017 मध्ये निराश होऊन पीडित महिलेने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल केली. कोर्टाने पीडित महिलेची आई, भाऊ यांची बाजू ऐकून घेतली. जानेवारी 2023 मध्ये कोर्टाने पीडित महिला घरगुती हिंसाचाराची बळी असल्याचे मान्य केले. कोर्टाने पिडीत महिलेसाठी दादरमध्ये घर शोधण्याचे किंवा पर्यायी घरासाठी 75 हजार रुपये, दरमहा दीड लाख रुपये देखभाल भत्ता आणि 3 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत फेरविचार याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावत कनिष्ट न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आता आरोपी पतीला पिडीत महिलेला न्यायालयाचा आदेश पाळावा लागणार आहे. त्यानुसार आरोपी पतीला आता पिडीत महिलेला नुकसान भरपाई म्हणून 3 कोटी रुपये आणि महिना दीड लाख रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. पिडीत महिलेला ही रक्कम तिचा मानसिक छळ आणि भावनिक त्रासाची भरपाई म्हणून देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.