माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत शेंदुर्णी नगरपंचायत ला पुन्हा पुरस्कार

5

शेंदुर्णी –   महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत ने नाशिक विभागात प्रथम व राज्यात ९ वा क्रमांक मिळविला. यामुळे ह्या नप ला 75 लाख रु. चे बक्षीस जाहीर झाले आहे.या पुरस्कारामुळे शेंदुर्णी शहराचा डंका पुन्हा वाजला आहे.
पृथ्वी,वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यात 2020 पासून राबविण्यास सुरुवात झाली. ह्या पूर्वीही शेंदुर्णी न प ने माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत 2 कोटींचे बक्षीस मिळवून शेंदुर्णी शहराचे नाव राज्यात, देशात नेहमीच उंचावले आहे.
यावेळी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी ह्या पुरस्काराचे स्वागत केले. माझी वसुंधरा अभियानामध्ये दोन वेळेस पुरस्कार प्राप्त करून असा उपक्रम करणारी शेंदुर्णी नगरपंचायत ही जळगांव जिल्ह्यातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.शेंदुर्णी नप ने माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत एकूण ८१०० पैकी ५२७९ गुण मिळविले आहेत. उपक्रमांतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवायच्या आहेत. जाहीर झालेल्या बक्षिसाची ५० टक्के रक्कम निधी अर्थसंकल्पित झाल्यानंतर तत्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाना दिली जाणार आहे तर उर्वरित रक्कम सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर केल्यावर मिळणार आहे. शेंदुर्णी नप भविष्यात अनेक पुरस्कार प्राप्त करेल असेही ते म्हणाले..सदर अभियान यशस्वी करण्यासाठी माझी वसुंधरा प्रमुख अभियंता लोकेश साळी यांनी प्रयत्न केले.