मुंबई – दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्यावर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली, आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.


