महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलची गंभीर टंचाई कायम , अनेक पंपांवर 5-6 तासात इंधन संपत असल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा

जळगाव – राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. कॅन, ड्रम, बॉटल घेऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरायला जात आहेत. काही ठिकाणी तर रात्रीपासूनच लोक रांगा लावून आहेत. अनेक पेट्रोल पंपावर दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. रणरणत्या उन्हातही लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी तर 5 ते 6 तासातच इंधन संपत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधन नाही, पेट्रोल डिझेल संपले… असे बोर्ड लावलेले दिसत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा न करण्याचं आवाहन करत आहेत. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. कुऱ्हा काकोडा येथील एसआर पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल घेण्यासाठी लोक एक ते अर्ध्या किलोमीटर पर्यंत रांगेत उभे आहेत. कुऱ्हा येथील दुसऱ्या द्वारका किसान पेट्रोल पंपावरही दोन दिवसापासून पेट्रोल नाहीये. दोन दिवसांपासून दोन्ही पेट्रोल पंपावर पेट्रोलची भीषण टंचाई आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा साठा मुबलक असल्यांनी कोणीही इंधनाची साठवणूक करू नका? आणि अफेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. तरीही लोक त्याकडे दुर्लक्ष करून पेट्रोल पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी आलेल्या गर्दीमुळे पाच ते सहा तासातच इंधन पुरवठा संपत असल्याचं समोर येत आहे.