NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन ? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी

बीड : NEET पेपरफुटी प्रकरणात आता बीड आणि लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा नीट परीक्षा देत होती. तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षेला बसला होता. हा पेपर या दोघांसाठीच घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सीबीआयच्या चौकशीनंतर अंबाजोगाई परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षिका असलेल्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे.

नीट घोटाळ्याचा कथित मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर ब्रँड अँबेसिडर असल्याचं समोर आलं. 2024 मध्ये या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या लेटरहेडवर मोटेगावकरचा ‘ब्रँड अँबेसिडर’ असा उल्लेख आढळून आला आहे. यामुळे मोटेगावकरशी संबंधित क्लास चालक आणि शैक्षणिक नेटवर्कही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीड शहरातील शाहूनगर परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून या भागाला शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं.