20 वर्षानंतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या घरी

239

जळगाव: राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. 20 वर्षात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सुध्दा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं. मात्र दुसरीकडे खडसे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या बाबत पत्रकारांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, खडसेंना शह देण्याची कोणतीही खेळी नाही, जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासाठीच आपण गेल्या 20 वर्षात प्रथमच एकनाथराव खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गेलो होतो, असं ते म्हणाले.