आमखेडा येथील शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या शासकीय स्वस्त दुकानावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसे तालुका अध्यक्षांचा महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा ईशारा

92

आमखेडा प्रतिनिधी – आमखेडा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानामार्फ़त सर्व सामान्य जनतेला सणासुदीला व नियमित शिधा वाटप न करता सतत दुकान व ई पॉश मशीन बंद असल्याची बतावणी करून शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या शासनमान्य दुकानावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (दी.१ मे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोयगाव तालुका अध्यक्ष रामा सुभाष एलिस यांनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.

या प्रकरणी त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण  विखे, महाराष्ट्र राज्य,विभागीय महसूल आयुक्त  छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी -छत्रपती संभाजीनगर व  जिल्हा पुरवठा अधिकारी -छत्रपती संभाजीनगर, यांना प्रत्यक्ष निवेदन दिली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रामा एलिस यांनी सोयगाव तहसीलदार यांना १० एप्रिलला निवेदन देऊन हिंदू – मुस्लिम समाजाच्या अक्षय तृतीया (आखाजी) व ईद येऊन ठेपली असतांना आमखेडा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार आपले दुकान बंद ठेऊन आहे. त्यामुळे गोर गरीब शिधापत्रिका धारक शासकीय शिध्यापासून वंचित आहेत. तसेच जनतेशी उर्मट भाषेत बोलणाऱ्या व मनमानी करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येऊन त्यास पाठीशी घालणाऱ्या तालुका पुरवठा अधिकारी नाना मोरे यांची चौकशीअंती व कारवाई करण्याची मागणी केली होती.

सोयगाव तहसील प्रशासनाने वेळकाढू धोरण राबवून अद्याप चौकशी व कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे सोयगाव तहसीलदार, पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानावर यांच्यावर  कारवाई व्हावी यासाठी मनसे तालुका अध्यक्ष रामा एलिस यांनी आता प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरुद्ध  महाराष्ट्र दिनी (दी.१ मे) स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.

निवेदनाच्या प्रति महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, महाराष्ट्र राज्य,विभागीय महसूल आयुक्त  छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी – छत्रपती संभाजीनगर व  जिल्हा पुरवठा अधिकारी -छत्रपती संभाजीनगर, प्रत्यक्ष भेटून देण्यात आल्या आहेत

दत्तात्रय काटोले