जळगाव कारागृहात करोनाचा शिरकाव , १८ कैदी बाधित , प्रशासन हादरलं ..!

163
जळगाव : – जळगाव जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हा उपकारागृहातही करोनाने शिरकाव केला असून कारागृहातील १८ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासन हादरलं आहे.
कोविड 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करून देणेकरिता तात्पुरते कारागृह तयार करणेबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते. या निर्देशाचे अनुषंगाने
जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र कोविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहामध्ये आजपावेतो दाखल झालेल्या सर्व ४०० कैद्यांची कोविड चाचणी आरोग्य विभाग, जळगाव महानगरपालिका यांचेमार्फत करण्यात आली असून त्यापैकी १८ कैदी हे करोना बाधित आढळून आलेले आहेत. उर्वरित सर्व कैदी हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. सर्व कैद्यांची तपासणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाफ यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत सर्व कैद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. करोना बाधित आढळून आलेल्या १८ कैद्यांपैकी ५ कैद्यांची न्यायालयाद्वारे जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यांना जळगाव शहरातील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये १३ करोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्फत सुरु असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.