जळगावात ‘स्मार्ट हेल्मेट’ द्वारे नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम

184

 प्रतिनिधी जळगाव –  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जळगावातील युवाशक्ती फाउंडेशन प्रशासकीय आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेनुसार युवाशक्ती फाउंडेशनने भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जळगावात ‘स्मार्ट हेल्मेट’ द्वारे नागरिकांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. वेळीच रुग्ण समोर येऊन तातडीने उपचार मिळाले तर करोनावर मात करता येऊ शकते. हे लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेने आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात दिला. मुंबईत स्मार्ट हेल्मेटद्वारे जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यातून रुग्ण समोर येऊन धारावीची परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेले पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरातही स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील करोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू असल्याने जळगावातील युवाशक्ती फाउंडेशनने भारतीय जैन संघटनेकडे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्मार्ट हेल्मेटची मदत मागितली. त्यानुसार भारतीय जैन संघटनेने तत्काळ प्रतिसाद देत निशुल्क मदत केली आहे.

काय आहे स्मार्ट हेल्मेट …? “स्मार्ट हेल्मेट’ हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले हेल्मेट आहे. त्यात अत्याधुनिक सेन्सर, थर्मल कॅमेरा आहे. थर्मल कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरीराचे स्क्रिनिंग केले जाते. त्यात शरीराचे तापमान मोजले जाते. हेल्मेटमधील थर्मल कॅमेऱ्याने एका मिनिटात २०० जणांच्या शरीराचे स्क्रिनिंग केले जाऊ शकते. याशिवाय या हेल्मेटमध्ये क्यूआर कोड स्क्रिनिंगची देखील व्यवस्था आहे. ब्लुटूथ सपोर्ट असणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये या हेल्मेटचा ऍक्सेस घेता येऊ शकतो. या हेल्मेटची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. भारतीय जैन संघटनेने युरोप देशातून हे हेल्मेट आयात केले आहेत.

पाच हजार नागरिकांची तपासणी ..
गेल्या तीन ते चार दिवसांपासून स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून जळगावात साडेचार ते पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातून २० ते २५ जण संभाव्य करोना रुग्ण म्हणून समोर आले. लक्षणानुसार त्यांना तत्काळ अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणीसाठी रेफर करण्यात आले. करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तत्काळ आरोग्य तपासणी होऊन त्यांना उपचारासाठी पाठवण्यात स्मार्ट हेल्मेट उपयुक्त ठरत आहे. जळगावात भारतीय जैन संघटनेचे ४ स्वयंसेवक आरोग्य तपासणीचे काम करत आहेत. त्यात क्षेत्र समन्वयक गौरव पानमंद, धीरज जाधव, जितीन गायकवाड व सुलतान शेख यांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात जळगाव शहरातील करोनाची हॉटस्पॉट परीसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती युवाशक्ती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.