औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीवेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि पोलीस कर्मचाऱ्यात वाद

193

प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीवेळी मतदान केंद्राबाहेर एक पोलीस कर्मचारी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलीस कर्मचाऱ्याने अब्दुल सत्तार यांना बाजूला थांबायला सांगितलं. त्यावरुन सत्तार यांनी मतदान केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे. क्रांती चौकातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. तर विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला. त्यावर संतापलेल्या पोलिसांनी सत्तार यांना उत्तर दिलं. त्यानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. त्यासाठी सत्तार यांनी पोलीस उपनिरीक्षकाला चांगलंच धारेवर धरलं. सत्तार यांनी मतदान केंद्रावर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 जागांसाठी मतदार होत आहे. त्यासाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सकाळी 8 पासून मतदानाला सुरवात झाली. त्यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार सतिश चव्हाण मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले. सत्तार आणि चव्हाण हे बराच काळ मतदान केंद्रावर थांबले होते. त्यावेळी मतदान केंद्रावर तैनात असलेल्या क्रांती चौक पोलीस ठाण्याचे हवालदार संजय भोकरे यांनी मतदान केंद्रावर दोन तासांपासून बसलेल्या सत्तार आणि चव्हाण यांना बाहेर जाण्याची विनंती केली. पोलीस कर्मचाऱ्याने बाहेर जाण्यास सांगितल्यानं सत्तार यांचा पारा चढला. तू आम्हाला सांगणारा कोण, असं विचारत तू विरोधकांचे पैसे खाल्ले असा आरोप सत्तार यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर पोलिसानेही मी पैसे खाल्ले असतील तर चौकशी करा, असं उत्तर दिलं. त्यानंतर बराच वेळ मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला होता. अखेर अनेकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.