भडगांवच्या उपकार्यकारी अभियंताला मारहाण करीत असतांना भांडण सोडविण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाचा धक्काबुक्कीत खाली पडून मुत्यु

223

मारहाणीत वायरमनचा मृत्यू झाल्याने दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

भडगाव( प्रतिनिधी शेख जावीद)  येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्‍यांना आवरण्यासाठी गेलेल्या वायरमनचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.याबाबत वृत्त असे की, भडगाव येथे आज शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांचे कृषीपंप विज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भडगाव उपविभागातील शहर, ग्रामीण भागातील उपकेंद्राना टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड लगत असलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात सात अज्ञात लोकांनी प्रवेश करत कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (वय ४३) रा. पाचोरा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रवेश करत जबर मारहाण सुरू केली. यात कंम्प्युटर, युपीएस. तसेच टेबलावरील व कबिनच्या काचा फोडत अंदाजे ५० ते६० हजार रुपये पर्यतच्या शासकीय मालमत्तेचे साहित्य फोडुन नुकसान करुन उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना चापटाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ करत दमदाटी केली.
यावेळी घटनास्थळी असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे हे भांडण सोडविण्यास गेले असता अज्ञात इसमांनी गजानन राणे यांना देखील धक्काबुक्की केली. यात गजानन राणे खाली पडुन मयत झाले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अजय धामोरे यांना मारहाण करण्यास आलेले अज्ञात ७ इसम वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन राणे यांचे मरणास कारणीभुत असुन उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फीर्यादीत नमुद केले आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी पो.स्टेला दिलेल्या फीर्यादीवरुन अज्ञात ७ इसमा विरुध्द गुरन १३३/२०२१ भादवि कलम ३०७, ३०४, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, सह सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांची भेट भडगांव महावितरण कंपनीच्या अधिकारी वर हल्ला हल्यात वायरमन मयत या घटनेची माहिती भडगांव शहरासह तालुक्यात वार्‍या सारखी पसरली. महावितरणचे कर्मचारी यांनी कार्यालयाकडे धाव घेत अधिकारी यांना धिर देत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, चाळीसगाव भाग उप विभागिय पोलीस आधिकारी कैलास गावडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट देत तपास बाबत मार्गदर्शन केले याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहे.