वडगाव कडे येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल

379

लोहारा ( दिनेश चौधरी )

सगळीकडे पावसाने दडी मारली असून पाऊस न येण्याचे कारण म्हणजे वृक्षतोडीमुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास असे म्हटले जाते. याकरिता बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादले असतांनाच पाचोरा तालुक्यात एका बाजूला वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचे शेकडो फोटो प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बघावयास मिळतात परंतु दुसरीकडे आजही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याचे एकमेव कारण म्हणजे वनविभागाने घेतलेले अर्थपूर्ण झोपेचे सोंग असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ऑगस्ट महिना सुरु असून आत्ता सुध्दा पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या अवैध वृक्षतोडीबाबत तक्रार करणाऱ्या अर्जदारास व या वृक्षतोडीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास संबंधित वृक्षतोड करणाऱ्या शेतकऱ्यांने जीवे मारण्याची धमकी देत पत्रकाराला मारहाण केली याबद्दल मारहाणीची तक्रार देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जात असतांना रस्त्यावर अडवून दिनांक १३ ऑगस्ट शुक्रवारी अशी दोन वेळेस बेदम मारहाण केल्याची घटना वडगाव कडे येथे घडली असून याबाबत रितसर तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक समजते.

वडगाव कडे व शिवारात विकास गोपाळ पाटील यांची शेतजमीन गट क्रमांक १८/१/ब/अ ही असून याच शेतजमिनी आहे.यांच्या शेताजवळच शिव असल्याने व शिंदाड येथील विशाल रघुनाथ पाटील यांचा काही एक संबंध नसतांना तसेच महसूल विभाग किंवा वनविभागाची रितसर परवानगी न घेता शेतकरी विकास गोपाळ पाटील यांची कुठलीही संमती न घेता लाकूड व्यापाऱ्याला विकल्याने ती झाडे लाकूड व्यापाऱ्याने कापली असता याबाबत विकास गोपाळ पाटील जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने विकास पाटील यांनी पाचोरा वन विभागाकडे रीतसर तक्रार देऊन वृक्षतोडी बद्दल कारवाई होण्यासाठी मागणी केली होती.

या तक्रारीच्या अनुशंगाने व तक्रारदार सख्खा भाऊ असल्याने तसेच हिरव्यागार झाडांची कत्तल झाल्यामुळे पुण्यनगरीचे पत्रकार विनोद पाटील कापलेल्या झाडांचे छायाचित्र घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रघुनाथ भास्कर पाटील व विशाल रघुनाथ पाटील या दोघांनी मिळून विनोद पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली याबाबत विनोद गोपाळ पाटील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात असतांना रघुनाथ भास्कर पाटील व विशाल रघुनाथ पाटील यांनी विनोद पाटील यांना रस्त्यावर अडवून पुन्हा मारहाण केली या मारहाणीत गोपाळ पाटील यांना जबर मार लागला असून हाताला अस्थिभंग झाल्याचा संशय आहे.

मारहाणीत दाताला मार लागल्याने जखमी झालेले विनोद पाटील.

या मारहाणी बाबत पत्रकार विनोद पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद केला असून कारवाईची मागणी केली आहे. मात्र उजव्या हाताला जास्त मार लागुन अस्थिभंग झाल्याचा अंदाज असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाचोरा येथे पाठवण्यात आले आहे.

या घटनेचा पंचक्रोशीतून निषेध नोंदवला जात असून राजरोसपणे होणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल कायमस्वरूपी थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमी कडून केली जात आहे.

पावसाळ्यातही वीरप्पन ची पिल्लावळ सक्रिय
उन्हाळा संपून पावसाळा लागला ऑगस्ट महिन्यात पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे, नांद्रा, सामनेर, अंबे वडगाव, कुऱ्हाड, लोहारा, पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा या परिसरातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून या लाकूड व्यापाऱ्यांना वनविभागाकडून छुपा पाठिंबा मिळत असल्याने दिवसाढवळ्या राजरोसपणे हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे दिसून येते याबाबत निसर्गप्रेमींनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता एक तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात किंवा भ्रमणध्वनी किंवा कार्यालयीन फोन स्वीकारले जात नाही तरी या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.