सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र

218

 

 

पहूर , ता . जामनेर (प्रतिनिधी ) : – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय डाक विभागातर्फे पंतप्रधानांना पत्र लेखन या विशेष उपक्रमांतर्गत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ .हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित पत्र लेखन स्पर्धेत विद्यार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे .यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . भारतीय टपाल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधानांना पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी ‘२०४७ मधील भारत ‘आणि ‘स्वातंत्र्य संग्रामातील योद्धे ‘ असे विषय देण्यात आले आहेत .
पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत झालेल्या पत्र लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला .
स्पर्धेचे उद्घाटन पहुर टपाल विभागाचे पोस्ट मास्तर एस . पी . मेहरुणकर यांच्या हस्ते झाले . यावेळी त्यांचा आणि टपाल कर्मचारी अमोल लोखंडे यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
प्रत्येक शाळेतील सदर पत्र प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली येथे पाठविले जाणार असून त्यातील निवडक ७५ विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटता येणार आहे . नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांना संवाद साधण्याची संधीही पोस्ट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार आहे .तसेच नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही अभ्यास सहल सदर विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण खर्च भारत सरकारच्यावतीने केला जाणार आहे . स्पर्धा समन्वयक म्हणून सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामरे यांनी काम पाहिले .सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वितेसाठी सहकार्य केले .