गुढीपाडव्याच्या पासुन शेंदुर्णीत शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ

133

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
खान्देशातील विख्यात संतकवि आणि भगवत् भक्त वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
चै.शु.प्रतिपदा गुढीपाडवा दि.२२ मार्च ते चै.शु.अष्टमी दि.२९ मार्च पर्यंत दररोज रात्री ८-३० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार प्रा.सौ.स्मिताताई आजेगांवकर ( पुणे ) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असुन त्यांना गंगाधर देव ( पुणे ) हे हार्मोनियम वर तर तबल्यावर मयुर वराडे (धुळे) हे करणार आहे.
चै.शु.नवमी दि.३० मार्च गुरुवार सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादी वारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे रसाळ कीर्तन होणार असुन यासाठी ह.भ.प.वारकरी संप्रदाय भजनी मंडळ शेंदुर्णी यांची साथसंगत लाभणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसाद वितरण होईल. रात्री ८ वाजता श्री ची शहरातुन सवाद्य भव्य पालखी मिरवणुक निघणार आहे.
यंदाचे श्रीराम जन्मोत्सवाचे हे १०२ वे वर्ष आहे. या उत्सवात महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार यांनी आपली सेवा प्रभु रामरायाच्या चरणी केली आहे.
या उत्सवात ह.भ.प.वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी तसेच शेंदुर्णीकर ग्रामस्थ यांचा सहभाग आणि सहकार्य लाभत आहे. तरी सर्व भाविक सज्जनांनी या श्रीराम जन्मोत्सवात भाविकतेने सहभागी होऊन उदारतेने आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.