औषधनिर्माणशास्र (फार्मसी) करियरसाठी सर्वोत्तम पर्याय – प्राचार्य डॉ. संजयकुमार बारी

1110

डॉ. निलमकुमार अग्रवाल शेंदुर्णी – 

रोगांच्या प्रादुर्भावामुळे, विविध रोगांच्या साथीच्या कालावधीत व करोना संक्रमणाच्या कालावधीत अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबरच औषधांचाही या मूलभूत गरजांमध्ये समाविष्ट करायला हवा एवढी आवश्यकता भासली. औषध विना जीवन या गोष्टीची आपण कल्पनाच करू शकत नाही. औषधी हा आपल्या आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. औषधींमधील ज्ञान, औषधांचे दुष्परिणाम तसेच या बाबत लोकांमध्ये आरोग्याबाबत वाढत असलेली काळजी व सजगता यामुळे मानवाच्या आरोग्यात सुधारणा होत आहे त्यातून विविध आजारांवर औषधउपचार व त्यातून मृत्यूच प्रमाण अल्प होणे या गोष्टी मानवाने साधल्या आहेत. भारतात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, अत्यआधुनिक तंत्रज्ञानपद्धतीचा वापर, बौद्धिक संपदा, हक्कांविषयांची जागरूकता व माहिती इत्यादी कारणांमुळे भारतात औषधनिर्माण आणि औषधसंशोधन उद्योगाची अतिशय वेगवान गतीने प्रगती होत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या संधी फार्मसी क्षेत्रात उपलब्ध होत असून, आव्हानात्मक करिअर हे क्षेत्र म्हणून ते उदयास येत आहे. फार्मसिस्ट हा आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांपैकी एक महत्वाचा भाग आहे. औषध निर्मिती व वितरण, औषधवापराबाबत रुग्णांना मार्गदर्शन करणे हे फार्मासिस्टचे काम असते. औषधनिर्माण आणि औषधसंशोधन क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी, देशांतर्गत व देशाबाहेर वाढलेली औषधांची मागणी यामुळे या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी व करिअरसाठी चांगला पर्याय बनला आहे.
महाराष्ट्रातील फार्मसी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता माहिती
अभ्यासक्रम कालावधी प्रवेश क्षमता (अंदाजे)
पदविका (डी. फार्मसी) दोन वर्षे ३३०००
पदवी (बी. फार्मसी) चार वर्षे ३४०००
पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी) दोन वर्षे ४७००

 फार्मसी क्षेत्रात उपलब्ध करिअरच्या विविध संधी –
१) शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील विविध संधी – अन्न व औषध प्रशासन (F.D.A.) या विभागत औषध व अन्न निरीक्षक (Drug Inspector) किंवा गव्हर्नमेंट अॅनालिस्ट, औषधनिर्माण अधिकारी या विविध प्रकारच्या संधी पदविका व पदवीनंतर उपलब्ध आहेत. विविध औषधांची व औषधी द्रव्यांची टेस्टिंग, स्टेट गव्हर्नमेंट व खासगी टेस्ट लॅबोरेटरीजमध्ये हि संधी उपलब्ध असतात असतात. त्यासाठी M.P.S.C., U.P.S.C व संबंधित परीक्षा पास होणे गरजेचे आहे.
२) शिक्षणक्षेत्र – बी. फार्मसी प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी डी. फार्मसी (पदविका) आणि एम. फार्मसी प्रथमश्रेणी पास विद्यार्थी बी. फार्मसीत (पदवी) महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करू शकतो. यामध्ये उच्चशिक्षण म्हणजे पी.एच. डी. घेतल्यानंतर पदोन्नती मिळू शकते. तसेच संशोधनासाठी JRF – SRF सारख्या विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच पीएच. डी. पदवी घेतल्यानंतर पोस्टडॉक्टरेट फेलोशिपही मिळू शकते.
३) फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग – विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औषधी उत्पादन कंपन्यांमध्ये सर्वांत महत्वाच्या विभागात म्हणजे औषधनिर्मिती विभागात प्रॉडक्शन फार्मासिस्ट म्हणून नोकरी करू शकतो. तो विविध प्रकारच्या तांत्रिक विभागांत प्रॉडक्शन पॅकेजिंग, आर अँड डी, टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अंशुरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, औषधी इंटलेक्चुअल राइट्स काम करण्याच्या संधी उपलब्ध असतात.
४) क्वॉलिटी कंट्रोल – औषधी उत्पादनात गुणवत्तेचे नियंत्रण करणे हे अत्यआवश्यक आहे. या विभागात सॅम्पलिंग, अनलिसिस, स्टोअरेज, रॉ-मटेरिअलची तपासणी करतात. विविध देशांच्या रेग्युलेटरी संस्थाकडून औषधांची निर्मितीसाठी विवध मानांकन ठरवली जातात व त्यानुसार औषधांची निर्मिती होते कि नाही हे औषधी उत्पादनाच्या तपासणीतून ठरवले जाते. यात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाल्यानंतर ट्रेनी केमिस्ट ते मॅनेजरपदापर्यंत औषधनिर्माणशास्र स्थानक पोहोचू शकतो.
५) क्वॉलिटी अँशुरन्स – हा औषधी उत्पादन कंपन्यांमध्ये एक महत्वाचा विभाग असतो यात निर्मित औषधांच्या गुणवत्तेची खात्री केली जाते. खात्रीशीर किंवा उच्च दर्जाची औषधी निर्मिती न झाल्याने वेगवेगळे दुष्परिणाम उदभवू शकतात आणि ते या क्वॉलिटी अँशुरन्स विभागाकडून ओळखले जातात व दूर केले जातात. यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पी.एच. डी. नंतर नोकरी विविध पदांवर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औषधी उत्पादन कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
६) रिसर्च आणि डेव्हलपमेंट : दिवसेंदिवस नवनवीन औषयांची गरज भासत आहे तसेच करोना संक्रमणाच्या काळात हि आवश्यकता अधिकच जाणवली. त्यामुळे औषधांची आवश्यकता मानवजातीतील सर्वांनाच आहे. या विभागात मुख्यतः नवीन औषधी मॉलिक्युल ओळखून त्यावर पुढे मानवीय उपयोगासाठी चार टप्प्यात (फेजेस) संशोधन केलं जात व तसेच जुन्या उपलब्ध औषधांची निर्मितीची प्रक्रिया, स्वरूप बदलत जास्त परिणामकारक व गुणकारी करण्यासाठी बदल केले जातात. या विभागात संशोधन सहायक म्हणून सुरुवातीला काम करता येत व त्यासाठी पदवीयुत्तर म्हणजे एम फार्मसी व तसेच पूर्ण वेळ पी एच डी पदवी असलेल्या विध्यार्थ्यांना प्राधान्य दिल जात.
७) क्लिनिकल फार्मसी / रिसर्च – नवीन औषध तयार केल्यानंतर विविध टप्प्यांत त्यांच्या विविध चाचण्या घेतल्या जातात. या सर्व गोष्टी क्लिनिकल ट्रायल किंवा रिसर्चमध्ये येते. नवीन औषधांची मानवी शरीरातील विविध अवयवांवर वयोगटानुसार काय परिणाम होतात याच्या चाचण्या केल्या जातात. पदवी / पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी यात चांगले करिअर करू शकता.
८) फार्माकोविजिलेंस – क्लिनिकल फार्मसी – पेशंटच्या सर्व गोष्टीवर डॉक्टर लक्ष ठेवू शकत नाही. विविध हॉस्पिटलमध्ये पेशंट घेत असलेले औषधी, त्यांची मात्रा, पेशंटने पूर्वी घेतलेल्या औषधींचा इतिहास व त्यांचे परिणाम, औषधांचा साइडइफेक्ट, कोणत्या औषधांची अॅलर्जी या सर्व घटकांचा अभ्यास क्लिनिकल फार्मासिस्ट करतो. या क्षेत्रात परकीय देशात विविध संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
९) मेडिकल कोडिंग, डेटा सायन्स व ट्रान्सक्रिप्शपिस्ट – सध्या कोडिंग भारतातील वाढत्या उद्योगांपैकी एक आहे. त्यात पदवी / पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी यात चांगले करिअर करू शकता. यामध्ये पेशंटची व औषधींची त्यांच्या वापरा संबंधीच्या महत्वाच्या सूचनांची परीपूर्ण माहिती एकत्रित करण्याचे काम असते. पेशंटची औषधी, जीवनशैली, औषधी घेण्याची पद्धत साइडइफेक्ट अॅडव्हर्स ड्रग्ज इफेक्ट, औषधींची मात्रा, कुठल्या प्रकारच्या औषधींची अॅलर्जी आहे, याबाबत नोंदीचे काम करू शकतात.
१०) कम्युनिटी फार्मसी – आरोग्याविषयक दक्षता व काळजी हि पेशंटसाठी काळाची गरज बनली आहे. विकसित देशांत कम्युनिटी फार्मासिस्टला भरपूर वाव आहे तसेच भारतातील प्रमुख शहरांमध्ये आता या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस पेशंटकडे लक्ष केंद्रित करण्याच्या वाढत असलेल्या गरजेमुळे कम्युनिटी फार्मासिस्टला चांगल्या संधी प्राप्त होत आहेत.
(११) हॉस्पिटल फार्मासिस्ट – प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून डी. फार्मसी, बी. फार्मसी झाल्यानंतर नोकरी मिळू शकते. पूर्ण ज्ञान, औषधी बनविण्याचे कौशल्य व वितरणाचे नियोजनबद्ध कार्य हॉस्पिटल फार्मासिस्ट करतात.
(१२) फार्मास्युटिकल मार्केटिंग – फार्मास्युटिकल सेल व प्रॉडक्ट मॅनेजमेंट या दोन विभाग यात मोडले जातात. औषधांबद्दलचे आद्ययावत ज्ञान, संभाषणकौशल्ये, व्यक्तिमत्व गुणांवर मेडिकल प्रतिनिधी ते मार्केटिंग मॅनेजरपदापर्यंत पदविका व पदवी स्थानक फार्मास्युटिकल मार्केटिंग / सेलमध्ये भरारी घेऊ शकते. प्रॉडक्ट मॅनेजमध्ये प्रॉडक्ट एक्झिक्यूटिव्ह ते ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजरपर्यंत पोहोचू शकतो. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपन्यानमध्ये मार्केटिंगसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
१३) इंडस्ट्री रेग्युलेटरी अफेर्स – यात प्रामुख्याने कंपनीचे औषधी प्रोडक्शन (भारतात किंवा परकीय देशामध्ये) विक्रीसाठी आणण्याचे काम करतात. या विभागात नवीन औषध बाजारात आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व तपशीलवार माहिती संकलित करणे, लिहणे, पडताळणी झाल्यावर अन व औषध विभागास वारंवार माहिती कळवत विक्रीचा परवाना मिळविण्या पर्येंतसह मार्केटिंग अॅप्रूव्हल परमिशन, क्लिनिकल ट्रायल, रेग्युलेटरी डॉक्युमेंट तपासण्याचे काम केले जाते.
१४) आर्टिफिशियल इंटेलिंज – फार्मसी क्षेत्रात, आर्टिफिशियल इंटेलिंज संशोधकांसोबत विद्यमान औषधांच्या निर्णय प्रक्रियेस समर्थन देण्यासाठी आणि इतर परिस्थितींसाठी विस्तारित उपचारांसाठी तसेच अनेक डेटा स्रोतांमधून योग्य रुग्ण शोधून क्लिनिकल चाचण्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी काम करत आहे. तसेच औषधाला लक्ष्य ज्ञात असल्यास, कोणत्या प्रकारच्या रासायनिक संरचना लक्ष्याला इच्छित रीतीने बांधू शकतात हे सांगण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिंज चा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ज्ञात आणि कार्यक्षम औषधांची रासायनिक रचना किंवा एंडोजेनिक घटकांचा वापर लक्ष्य ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे संभाव्य औषध लक्ष्याची रचना स्पष्ट होते. त्यामुळे त्यातहि आर्टिफिशियल इंटेलिंजचे आणि रोबोटिक प्रणालीचे सखोल ज्ञान असणार्या औषधनिर्मात्यांना रोजगाराच्या विवध संधी उपलब्ध आहेत.
भारतात फार्मासिस्टला प्रमुख अधोरेखित स्थान देण्यात आलेले नाही. या उलट अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, इंग्लड यासारख्या विकसित देशांत फार्मासिस्टला डॉक्टरांबरोबर महत्व आहे. जागतिकीकरणामुळे भारतातही फार्मासिस्टला डॉक्टरांच्या तुलनेबरोबरच स्थान मिळेल. कारण आज औषधनिर्माणशास्र जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे.

– प्राचार्य डॉ. संजयकुमार बारी
शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे,
एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर, जि. धुळे
एन.बी.ए. मान्यता प्राप्त बी.फार्म कोर्स, Academic audit ‘A”grade,Best College Award & Best Principal Award by Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University,Jalgaon
संपर्क: ९४२३९१८०२३