जळगाव : राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव निश्चित… !

217

 

प्रतिनिधी जळगाव : –  राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस झाल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे  यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झाली आहेत.
विधानपरिषदेत राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून लागली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून दिली जाणारी प्रस्तावित 12 आमदारांची नावं समोर आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळाली आहे.
खडसेंना संधी दिल्यानंतर राष्ट्रवादीला काय फायदा ?
खडसे हे ओबीसी समाजातून आलेले आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्याशिवाय खडसे यांचं उत्तर महाराष्ट्रातही मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी काळात खडसेंच्या साथीने सहकारी बँकांपासून ते पालिका आणि नगरपरिषदेतील भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यावरही राष्ट्रवादीचा भर असणार आहे. खडसेंना विधान परिषदेत आणल्यास विरोधी पक्षाला नामोहरम करण्यास फायदाच होणार असल्याने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.