मेणगाव येथील प्रगतीशिल शेतकरी सुरेश पाटील यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

1748

दिनेश चौधरी लोहारा याज कडून….
जळगाव- राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे मेणगाव (ता.जामनेर) येथील प्रगतीशिल शेतकरी सुरेश नारायण पाटील यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
एका छोट्याशा गावातील सर्वसामान्य परिस्थितीमधील शेतकरी देखील शेतीत विकास प्रगती करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मेणगाव येथील सुरेश नारायण पाटील होय.
त्यांनी आपल्या शेतात रासायनिक खते वापरणे हळू हळू कमी करीत ते आज आपली पूर्ण शेती फक्त गाईंचे शेण आणि गोमूत्राचा वापर करुन करतात. त्यांच्या शेतात जवळपास सात एकर पेरुची अत्यंत नयनरम्य अशी बाग असून त्यांनी ती फक्त गाईचे शेण, गोमूत्र, सेंद्रीय शेतीवर फुलवली आहे. त्यांच्या शेतात
3 एकरावर सीताफळ आहे.अतिशय गोड व अत्यंत जाड गर असलेलं फळ पाहायचे असेल, तर ते सुरेश भाऊ यांच्या शेतात दिसते.
ते कापूस असेल, हळद असेल, मका, ज्वारी सारखे अनेक पिके फक्त गोमूत्र अन् शेण खतावर घेत आहेत. अतिशय चिकाटीचा हा शेतकरी खूपच मेहनतीने उभा राहिला. गरिबीचे चटके सोसत असताना त्यांनी शेंदुर्णीत कित्येक वर्ष कपडे शिवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
पुढे ते गावाचे सरपंच झाले. त्यांनी ग्रामविकासातही मोलाचा हातभार लावला.
सुरेश नारायण पाटील या नावाचा माणूस जिथे जातो तिथे यश आपल्या पायाखाली तुडवत आणतो, असे अनेक ग्रामस्थ सांगतात. ते आजही गावातील गरीब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी काहीतरी भेट देतात. विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, मोठे व्हावे, असा प्रामाणिक हेतू समोर ठेवून ते गरजूंना यथाशक्ती मदतीसाठी पुढे असतात. या शेतीविषयक व सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण लवकरच होईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी सांगितले. सुरेश पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याला राजनंदिनी परिवारातर्फे मानाचा मुजरा…!