(Mumbai Local Trains) वेळ पाहून घराबाहेर पडा; सर्वांसाठी लोकल सुरू – रेल्वे प्रशासन

188

प्रतिनिधी मुंबई – कामावर जाण्याची आणि कामावरून घरी परतण्याची गर्दीची वेळ वगळता उर्वरित वेळेत सर्वांसाठी लोकल प्रवास  आजपासून सुरू झाली आहे. या प्रवासासाठी रेल्वेच्या अधिकृत यूटीएस मोबाइल अॅपवर तिकीट आणि पास उपलब्ध आहे. करोनाकाळात रेल्वे स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी मोबाइल तिकिटांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वेचे अधिकृत यूटीआस मोबाइल अॅप करोनापूर्वी जसे कार्यरत होते, त्याच पद्धतीने आताही सुरू करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तिकीट आणि पास काढता येईल. ऑनलाइन पद्धतीने रकमेचा भरणा केल्यास लगेचच प्रवाशांना तिकीट किंवा पास काढता येईल, गर्दीत रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होईल, असे रेल्वे माहिती प्रणाली केंद्राकडून (क्रिस) स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाउनपूर्वी पास काढलेल्या प्रवाशांना प्रवास न केलेल्या दिवसांसाठी सोमवारपासून मुदतवाढ देण्यात येणार आहे. यासाठी मात्र प्रवाशांना रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरच यावे लागेल. गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील सर्व एटीव्हीएम सुरू करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
यूटीएस अॅपच्या माध्यमातून पेपर तिकीट आणि पेपरलेस तिकीट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे पास सांभाळून ठेवणे, गहाळ होणे, पासचा कागद खराब होणे हे टाळण्यासाठी ‘शो तिकीट’ असा विशेष पर्याय देण्यात आला आहे. तिकीट तपासनीसांनी तिकिटाची मागणी केल्यास हे तिकीट ग्राह्य धरण्यात येईल.
करोनापूर्व काळात फेब्रुवारी महिन्यात यूटीएस अॅपच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेमार्गावर एकाच दिवसात पाच लाख पाच हजार तिकिटे काढण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटांची विक्री होणे हा चांगली बाब आहे. यामुळे रेल्वे प्रवासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिकीट सेवेला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अॅपच्या माध्यमातून सामान्य, तात्काळ, फलाट अशा प्रकारात तिकीट तसेच पास काढता येईल. तसेच रेल्वे स्थानकांतील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करूनही तिकीट घेता येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळण्यासाठी फलाट तिकिटाची सुविधा काही काळ अॅपवर देण्यात येणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.