संसदेची सुरक्षा भेदणारे, भारता विरुद्ध पाकिस्तानातील हस्तकाला माहिती देणारा व निलेश राणे यांच्या वर कारवाई ची मागणी

84

 

जळगाव –
अल्पसंख्याक शिष्टमंडळाचे राष्ट्रपतीला साकडे १३ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेच्या प्रेक्षक ग्यालरीतून दोन तरुणांनी संसदेत उडी मारून हैदोस घातला व अन्य दोघांनी संसदेबाहेर व संसदेत स्मोक कॅन्डल मुळे धुराचे ढग तयार केले तसेच मुंबई एटीएसने महाराष्ट्रातील जळगाव येथील गौरव पाटील ला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनाशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला दिल्याने अटक केली व महाराष्ट्र राज्यातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजा विरोधात असंसदीय भाषा (हेट स्पीच) व जिवे मारण्याची धमकी दिली या तिघी प्रकरणाचा जळगाव शहरातील अल्पसंख्याक समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध करून संबंधिताविरुद्ध कडक कारवाईची मागणी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्याकडे जिल्हाधिकारी जळगाव मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

सदरचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी सुपूद केले.

निवेदनातील मागण्या

१)भारतातील संसदेवर हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची आयबीची सूचना असताना सुद्धा संसदेच्या सुरक्षा पथकाने त्याची नोंद का घेतली नाही ? त्या सर्व सुरक्षा पदाधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे.

२)भाजप चे म्हैसूर चे खासदार प्रताप सिन्हा यांनी अटक करण्यात आलेले सागर शर्मा, डी मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम सिन्हा यांना कशाच्या आधारे संसदेची पास उपलब्ध करून दिली ? त्याबाबत सुद्धा चौकशी होऊन चौकशी होईपर्यंत खासदार प्रताप सिन्हा यांना निलंबित करण्यात यावे.

३) चारही तरुण व तरुणी चे परराष्ट्रामधील अतिरेक्यांशी तसेच भारतातील अतिरेकी संघटनांशी संबंध आहेत का ? याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी.

४) संसदेत व संसदेबाहेर धुमाकूळ घालणारे चारही अटक आरोपींवर तसेच फरार आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५) मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय, संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या जळगावच्या गौरव पाटील ज्याला अटक करण्यात आली आहे त्याची कसून चौकशी होऊन त्याचे कोणाशी हितसंबंध होते ? कोणा च्या सांगण्यावरून व संगनमताने त्याने हे कृत्य केले तसेच त्याचे फेसबुक व व्हाट्सअप मधील मित्र परिवाराची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर सुद्धा युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

६) महाराष्ट्र राज्यातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक व खास करून मुस्लिम समाजाविरुद्ध दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची हेट स्पीच देऊन त्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षणासंबंधी धमकीवजा इशारा दिला आहे की तुम्ही लोकशाही मार्गाने सुद्धा आरक्षणासाठी आंदोलन करू नये अन्यथा तुम्हाला घरी परत जाता येणार नाही व ज्या प्रकारे पाकिस्तान मध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहे त्याच प्रकारे महाराष्ट्रात तुम्हा अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येईल अशी असंसदीय भाषा वापरून त्यांनी मुस्लिमांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे आमदार पद रद्द करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चांद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाअध्यक्ष मजहर पठाण, एम आय एम चे जिल्हाअध्यक्ष अहमद शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष अमजद पठाण, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान फाईज, सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, इमदाद फाउंडेशनचे सचिव मतीन पटेल, तंबापुर फाउंडेशनचे आबिद शेख यांची उपस्थिती होती.