शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी.
खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील थोर भगवत् भक्त, खान्देशातील विख्यात संतकवी वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै.गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे उत्सवाचे हे १०४ वे वर्ष आहे.
आज चै.शु.नवमीला सकाळी शेंदुर्णी येथील सुप्रसिध्द सी.ए. सौरभ काबरा व सौ रक्षा काबरा यांच्या हस्ते प्रभु रामरायाला अभिषेक व महापुजा करण्यात आली.
चै.शु.प्रतिपदा दि.३० मार्च २०२५ रविवार ते चै.शु.अष्टमी दि.५ एप्रिल २०२५ शनिवार पावेतो दररोज रात्री ८-३० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,किर्तनभुषण ह.भ.प.सौ.स्नेहलताई पित्रे ( डोंबिवली -मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन श्रीराम मंदिराच्या समोर आयोजित करण्यात आले होते. त्यांना हार्मोनियम वर सौ.दुर्गा मुंडले (कुडाळ) तर तबल्यावर लव आडसुळ (सांगली) यांनी साथसंगत केली.हजारो भाविक कीर्तन ऐकण्यासाठी येत होते.
चै.शु.नवमी ६ एप्रिल २०२५ रविवारी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे पारंपरिक श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाले असुन यासाठी हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ शेंदुर्णी यांची साथसंगत केली.दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात आले.रात्री ८ वाजता श्री ची शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. यात हभप वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व हरिपाठ महिला भजनी मंडळ शेंदुर्णी, ग्रामस्थ मंडळी शेंदुर्णी यांचा सहभाग होता.जागोजागी भाविक पालखीचे दर्शन घेत होते.
यावेळी पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दुर क्षेत्राचे पोउनि.नंदकुमार शिंब्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.