राज्यात अडीच लाख नव्या नोकऱ्या ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

460

मुंबई: उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे २५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग प्रतिनिधी म्हणून जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोविड-१९ चे संकट जगावर असताना सुद्धा महाराष्ट्रात उद्योग विभागाने कमी कालावधीत २ लाख कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या टीमच अभिनंदन केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘या गुंतवणुकीत पिझ्झा, आइसक्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे. ‘घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील तुम्ही सर्व आहात. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. उद्योग मित्र ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील’, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वासित केले.उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. एक लाखाचा टप्पा पार करत आहोत. खास बाब म्हणजे करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उद्योजकांची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी २९ करार झाले आहेत. त्यापैकी २१ उद्योजकांना उद्योगांसाठी जमिनी दिल्या आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे. रोजगार वाढावा, गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सांगितले. उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, जगावर करोनाचे संकट असताना महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा टप्पा राज्याने गाठला आहे. जवळपास सहा महिन्यात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.